गोंदिया : देवरी तालुक्यातील पिंडकेपार/ गोटाबोडी येथील नाल्यात आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार, 20 जुलैच्या दुपारी अंदाजे 12.15 वाजता दरम्यान घडली. विजय नाईक (अंदाजे वय 38, रा. पिंडकेपार) असे मृतकाचे नाव आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून अति मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील देवरी तालुक्यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तालुक्यातील अनेक छोटे मोठे नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे, पहिल्या पावसाच्या पाण्यातून माशांचे बाहेर येण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लोक मासे पकडण्यासाठी जीवाची पर्वा न करता भर पुरामध्ये मासेमारी करीत असतात. प्राप्त माहितीनुसार, देवरी तालुक्यातील पिंडकेपार रहिवासी मृतक विजय नाईक ही व्यक्ती गावालगत असलेल्या पिंडकेपार गोटाबोडी या नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी गेला असता, पुराच्या पाण्यात तोल गेल्यामुळे बुडून मरण पावला. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. देवरी पोलीस स्टेशनला माहिती होताच, घटनास्थळी दाखल होऊन, मृतकाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस हवालदार बोपचे करीत आहे.

