अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : गावाबाहेर असलेल्या मुरमाच्या खाणीत बुडुन दहा वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना आज, 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास पिंपळगाव/खांबी येथे घडली. मृत मुलाचे नाव रजनिश वामन शिवनकर (वय 10) असे आहे. मृतक रजनिश शिवनकर हा विद्यार्थी मनोजदेव मानकर आदिवासी आश्रम शाळा बोंडगांव देवी येथे इयत्ता 4 मधे शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या तिन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र पुरजन्य परिस्थीती निर्माण झाली आहे. नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. तर गावागावातील खड्डे व गावाबाहेरील मुरमाच्या खाणी पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. अशावेळी तालुक्यातील पिंपळगाव/ खांबी येथील वामन शिवनकर यांची दोन्ही मुले अन्य मुलांसोबत पटाची दान परीसरात फिरायला गेले. या परिसरात मुरमाच्या मोठमोठ्या खाणी असुन मुसळधार पावसाने तुडूंब भरले आहेत. या खाणीत ही मुले आंघोळ करण्यासाठी उतरले. यामध्ये रजनिश वामन शिवनकर हा दहा वर्षाचा मुलगा खोल पाण्यात गेला. खोल पाण्यात बुडत असताना त्याचा 14 वर्षाच्या मोठ्या भावाने रजनिशला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे घाबरलेली मुले लगेच गावात येवुन लोकांना माहीती दिली. लगेच घटनास्थळी गावकरी आले व गावक-यांच्या मदतीने सदर मुलाला बाहेर काढण्यात आले. मात्र सदर मुलाचा मृतदेहच हाती आला. घटनेची माहीती मिळताच अर्जुनी मोर. पोलीस घटनास्थळी पोहचले. मुलाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले. छवविच्छेदनानंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन करून पिंपळगाव येथे त्याच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर मुलाच्या दुर्देवी मृत्युने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तपास पो.नि.सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात बिट अंमलदार कोडापे करीत आहेत.

