Home Uncategorized जिल्हा परिषदेच्या बरडटोली शाळा पुराच्या पाण्याने जलमग्न, पोषण आहार भिजले

जिल्हा परिषदेच्या बरडटोली शाळा पुराच्या पाण्याने जलमग्न, पोषण आहार भिजले

82
0

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसापासून मेघगर्जनेसह वादळी व मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच शुक्रवारला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरडटोली पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढलेली आहे. वर्ग खोल्यात कमरे एवढा पाणी साचल्याने सर्व साहित्याची नासधूस झालेली आहे. शालेय पोषण आहाराचे साहित्य पाण्यात भिजले गेल्याने साहित्य खराब होण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी वरिष्ठांना कळविलेली आहे.अर्जुनी मोरगाव परिसरात शुक्रवारला पडलेल्या रात्रभर पावसाने संपूर्ण परिसर जलमग्न झालेला आहे. आज शनिवार असल्याने सर्व शिक्षक व विद्यार्थी सकाळी सात वाजता शाळेत उपस्थित झाले, तर काय शालेय परिसर बघून अचंबित झाले. शालेय परिसर संपूर्ण जलमय झाले होते. वर्ग खोल्यात कमरे एवढा पाणी साचलेला होत. शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यात शिरुन सर्व साहित्य व्यवस्थित ठेवले. ही समस्या अनेक दिवसापासून उदभवत आहे. या समस्येबद्दल मुख्याध्यापकांनी संबंधित यंत्रणेला तसेच वरिष्ठांना पत्राद्वारे वारंवार कळविले आहे. परंतु अजून पर्यंत ही समस्या मिटलेली नाही. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील रहिवासी असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारकीचे दावेदार असल्याचेही बोलले जाते. त्यांच्याकडूनही आपल्या कार्यकाळात शाळेची समस्या सोडविता न आल्याने नागरिकांत त्यांच्याबद्दल रोष दिसून येत आहे.