गोंदिया : महाराष्ट्र राज्यामध्ये बुधवार, 10 जुलैपासून सुरू होत असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाचे अनुषंगाने काल गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण महसुली कार्यालयातील कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून आंदोलनाला सुरवात केली. यापुर्वी झालेल्या आंदोलनात राज्य शासनाने राज्य महूसल कर्मचार्यांना मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्या आश्वासनाची पुर्तता होत नसल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व महसुली कर्मचारी हे 10 जुलैपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा इशारा दिला होता. आंदेलनानुसार 10 जुलै रोजी काळ्याफिती लावून काम करणे, 11 रोजी दुपार नंतर कार्यालयावर निदर्शने, 12 जुलै रोजी लेखनीबंद आंदोलन तर 15 जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात सर्व महसूल कर्मचार्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य सहसचिव तसेच गोंदिया जिल्हाध्यक्ष आशिष रामटेके केले आहे. सदर संपात प्रामुख्याने दांगट समितीचा अहवाल मंजूर करणे व हरित पदे भरणे या मागण्या असल्यामुळे याचा फायदा सर्व सामान्य जनतेला देखील होणार आहे. यामुळे संपामुळे सर्व सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल आशिष प्र. रामटेके जिल्हाध्यक्ष तसेच राज्य सहसचिव महसूल कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

