गोंदिया : महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीला जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजीत कुळकर्णी यांनी 4 वर्षे साधा व 1 वर्षे सश्रम कारावास व 12 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा बुधवार 10 जुलै रोजी ठोठावली. हेमराज उर्फ हेमु ब्रिजलाल वाधवानी (वय 58) रा. हरीकाशी नगर, माताटोली गोंदिया असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हेमराज याने 17 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 11.45 वाजताच्या सुमारास फिर्यादी महिलेला एकटी असल्याचा फायदा घेत विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडीतेच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 354, 354(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करून प्रकरण न्याप्रविष्ठ करण्यात आले. सबळ साक्ष, पुरावे व पक्षकाराचा युक्तीवादानंतर आरोपी हेमराजवर दोष सिद्ध झाल्याने आज बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुळकर्णी यांनी आरोपी हेमराजला 4 वर्षाचा साधा कारावास, 1 वर्ष सश्रम कारावास व 12 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणाचा तपास शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार यांनी केला. सरकारतर्फे खटल्याची बाजू व युक्तीवाद सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी केला. न्यायालयीन कोर्ट पैरवी कामकाज पोलिस हवालदार ओमराज जामकाटे, पोलिस शिपाई किरसान यांनी केली.

