गोंदिया : लसीकरण हे बालमृत्यू व कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी साधन आहे. सर्व आजारांवर लढण्यासाठी बाळाला जन्मापासूनच वेगवेगळ्या वयोगटात लसीकरण दिल्यास रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक गावात लसीकरण सत्राचे आयोजन करावे व कुठलाही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करावे. नागरिकांनी बालकास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावुन मोफत लसीकरण करवून कवच कुंडले प्रदान करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी केले. नियमित लसीकरण बाबतची जिल्हास्तरीय टास्क फोर्स समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 31 मे रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी एम.मुरुगानंथम हे होते. सभेला जागतिक आरोग्य संघटना नागपुर विभागाचे सर्वेक्षण वैद्यकिय अधिकारी डॉ.साजिद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रोषण राऊत, शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ.पी.व्ही. रुखमोडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.बी. जयस्वाल, वैद्यकिय अधिकारी डॉ. सलील पाटील, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे कैलास गजभिये, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात, तसेच डॉ. दर्शना नंदागवळी, डॉ. सुकन्या कांबळे, डॉ. अमित कोडनकर, डॉ. ललित कुकडे, डॉ. विनोद चव्हाण, डॉ. राम वट्टी, डॉ. शुभम लंजे, बालरोग तज्ञ डॉ. सुनिल देशमुख, डॉ. सचीन उईके यांचेसह सर्व ग्रामीण रु़ग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, अशासकिय संस्थेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्थेत बीसीजी, हिपॅटायटीस-बी, पोलिओ, पेंटाव्हँलंट, रोटा व्हायरस, पीसीव्ही, आयपीव्ही, गोवर-रुबेला, जेई, डिपीटी, व्हिटँमिन-अ डोज ई. विविध लसीकरण मोफत दिले जात आहे. जिल्ह्यात नियमित लसीकरण अंतर्गत गावनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करुन बालकांना लसिकरण करण्यात येत आहे. पालकांनाही जागृत राहून सर्व लसीकरण करून घ्यावे, सर्व शाळेत टीडी लसीकरण मोहिमेचे नियोजन करताना जनजागृती करण्याचे निर्देश दिले.

