नवेगावबांध, (गोंदिया) : तीन दिवसापूर्वी 28 मे च्या सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका नवेगावबांध पर्यटन संकुलाला बसला. बुधवार, 29 मे रोजी नवेगावबांध येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना नवेगावबांधातील पर्यटनाचा आनंद घेता आलेला नाही. त्यामुळे पर्यटकांची निराशा झाली. तर या वादळी वाऱ्यामुळे नवेगावबांध पर्यटन संकुल परिसरातील असंख्य झाडे, मोठी झाडे, विद्युत खांब, तारा व वनविभाग व वन्यजीव विभागाच्या इमारतींना याचा जोरदार फटका बसला आहे. ठिकठिकाणी तुटून पडलेली झाडे, हे त्या इमारतींवर किंवा त्या तारांवर पडल्याने छप्परची मोडतोड झाली. परिसरातील संपूर्ण जाळी तुटून पडली आहे. या ठिकाणी प्रसिद्ध असलेले नवेगावबांध-नागझीराचे श्रेत्रसंचालकांचे लाॅगहट विश्रामगृह, साहसी खेळ, हिलटाॅप गार्डन, ग्रीनपार्क, उपहार गृह, गार्डन व इतर मालमत्तेवर वादळी तडाख्याचा परिणाम झालेला असून मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार दिवसापासून संपूर्ण संकुल परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मशीनी विद्युत पुरवठा अभावी बंद आहेत. सदर ठिकाणी वन विभागाकडून कुंडल येथून आलेले वन प्रशिक्षणार्थी तसेच चंद्रपूर वन प्रबोधिनीकडून आलेले वन प्रशिक्षणार्थी यांची या ठिकाणी प्रशिक्षण सुरू होते. त्यांच्याकरिता आपत्कालीन व्यवस्था म्हणून दोन जनरेटरची व्यवस्था वन्यजीव विभागाकडून करण्यात आली होती. या मोठ्या जनरेटरमुळे त्यांचे प्रशिक्षण पार पडले. इतर व्यवस्था अजूनही जसेच्या तसेच आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन क्षेत्राला इजा पोहोचली आहे. ही हानी भरून निघण्यासाठी बराच वेळ जाणार असून या विभागामध्ये पर्यटन संकुल ज्यांच्या अक्त्यारित आहे, असे महसूल विभाग, पाटबंधारे विभाग, वन विभाग(प्रादेशिक) व वन्यजीव विभाग (नवेगावबांध-नागझीरा) आहे. मोठ्या प्रमाणात या संकुल परिसरातील दरमहा लाखो-लाख रुपयाचे महसूल गोळा करणारी नवेगावबांध येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून अजूनही दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण परिसर हा जसेच्या तसे पडलेला आहे. हे परिसर ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्याकडून कुठल्याही हालचाली या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे हे पर्यटन क्षेत्र सध्यातरी या कामाविना पोरका झाल्याचे दिसत आहे. तर या ठिकाणी पडलेल्या झाडांचे सर्व लाकूड इंधन म्हणून गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गेल्या तीन दिवसापासून डुलाई करत आहे. त्या मुळेच निदान ये-जा होत आहे. वन व वन्यजीव विभागाच्या ताब्यातील शासकीय ईमारतीचे पंचनामे करून अहवाल वरिष्ठाकडे पाठविल्यानंतर सदर इमारती दुरूस्त करण्यात येतील, असे समजते.
काहीच उपाययोजना नाही…
येत्या 15 दिवसात पावसाळा सुरू होणार आहे, तेव्हा सर्व विभागाची कसोटी लागणार आहे. सध्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या व्यवस्थापनाकडे असलेले हिलटाॅप गार्डन गेल्या 4 दिवसापासून पाण्याअभावी प्रभावित झाले आहे. याकडे वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून काहीच उपाययोजनां होताना सध्या तरी दिसत नाही. मात्र, यात पर्यटकांची खूप निराशा होत आहे. पर्यटन संकुलाची व्यवस्था पूर्ववत लवकरात लवकर करावी, अशी मागणी पर्यटक प्रेमी करीत आहेत.

