Home गोंदिया जिल्हा समाजात समानता रुजविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक –        जिल्हाधिकारी प्रजित नायर

समाजात समानता रुजविण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक –        जिल्हाधिकारी प्रजित नायर

39
0

गोंदिया, दि.12 : समाजात समानतेचे वातावरण रुजविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त नाबार्डच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे महाप्रबंधक अविनाश लाड, अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे संस्थापक-सचिव विजय बहेकार, मत्स्यतज्ज्ञ मनीष राजनकर, बहेकार हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. गार्गी बहेकार, राधाबाई नर्सिंग स्कूलच्या प्राचार्या प्रिया वर्मा आदी उपस्थित होते.

         श्री. नायर यांनी शासन आपल्या स्तरावरून समाजातील विषमता दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहे. समाजातील समंजस लोकांकडूनही कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी समानतेने वागणे गरजेचे असल्याचे सांगितले. समानता रुजविण्यासाठी आईने मुला-मुलींमध्ये फरक तुलना न करता सारखेच संस्कार देणे गरजेचे आहे. घरातून झालेली सुरुवात ही समाजात रुजेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        प्रास्ताविकात प्रिया वर्मा यांनी महिलांचा सन्मान वर्षातून एकदाच नव्हे तर दररोज व्हायला हवा असे सांगितले. डॉ. गार्गी बहेकार यांनी महिलांच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याने 9 ते 14 वयोगटातील मुलींना प्रतिबंधक लस देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

       अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले की, अनेक संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले आहे. महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येणे गरजेचे आहे. तसेच मुलांमध्ये मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत पालकांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

          नाबार्डचे महाप्रबंधक अविनाश लाड यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले.

        या कार्यक्रमात भजेपारच्या सरपंच रुख्मिणी ठाकरे, नानव्हा येथील सरपंच गौरीशंकर बिसेन व उपसरपंच भाग्यश्री कटरे, बोरटोला येथील सारस महिला मत्स्य उत्पादन गटाच्या सरिता मेश्राम, तसेच फुलचूर येथील वीर राजे चिमणाबहादूर आर्ट अॅन्ड क्राफ्ट गटाच्या निशा रहांगडाले व त्यांच्या सहकारी महिलांचा सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेखा बानेवार यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विजय बहेकार यांनी मानले. कार्यक्रमाला बचत गटातील महिला व राधाबाई नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.