गोंदिया, दि.12 : सद्यस्थितीत युध्द परिस्थिती लक्षात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची तसेच गॅस इंधनाचे दरवाढीची, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्याकरीता जिल्हा स्तरावर दक्षता/फिरते पथक स्थापन करून गॅस एजन्सीच्या तपासण्या करण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभाग यांना दक्षता पथक तयार करुन तपासण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हयातील कॅटरींग, हॉटेल्स, मंगल कार्यालय, बेकरी, दवाखाने इत्यादी ठिकणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास त्यांचेवर जीवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 अंतर्गत कार्यवाही करावी, असेही निर्देश आहेत.
जिल्ह्यातील गॅस पुरवठ्याबाबत सर्व गॅस एजन्सीधारक व भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तिन्ही कंपन्यांच्या विक्री अधिकारी यांच्यासमवेत सभा घेण्यात आली असता, घरगुती गॅसचा गोंदिया जिल्ह्यात तुटवडा नसल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तीन्ही कंपन्यांचा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे याचा नियमित व सुरळीत पुरवठा राहील, असे संबंधित कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
आज रोजी पर्यंत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (१४.२ kg) दरात 60 रुपयांची वाढ झाली असून, आता तो 964.50/- प्रति सिलिंडर झाला आहे. तसेच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाली असून तो 1935 रुपये इतका झाला आहे. महिन्याला मिळणाऱ्या घरगुती सिलेंडरची मर्यादा 15 दिवसावरुन 25 दिवस करण्यात आलेली आहे.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच ऑईल कंपनी मिळून जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठा कायम राहील याबाबत कटीबध्द आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पंपावर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.




