बिजेपार: स्थानिक जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा, बिजेपार येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपल्या बालपणीच्या स्मृतींना उजाळा दिला आणि शाळेच्या विकासासाठी मदतीचा हात पुढे केला.
काही वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेतून उत्तीर्ण झालेले नवीन शिक्षक या शाळेत रुजू झाल्यापासून शाळेचा कायापालट होण्यास सुरुवात झाली आहे. या शिक्षकांच्या कार्याला ग्रामपंचायत सदस्य श्री. नरेंद्र परसराम गायकवाड यांनी मोलाची साथ दिली. शाळेच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीचा ५० हजार रुपयांचा निधी मंजूर असताना, श्री. गायकवाड यांनी स्वतःचे ३ लाख ५० हजार रुपये खर्चून शाळेची गळती थांबवणे, रंगरंगोटी, विद्युतीकरण आणि इतर दुरुस्तीची कामे पूर्ण करून शाळेला नवसंजीवनी दिली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वखर्चातून शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, प्रोजेक्टर आणि एका महिला शिक्षिकेची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल यंदाच्या २६ जानेवारीला शाळेच्या वतीने त्यांना ध्वजारोहणाचा बहुमानही देण्यात आला होता.
या माजी विद्यार्थी मेळाव्याला विविध वर्षांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. अनेक वर्षांनंतर जुने मित्र भेटल्याने परिसरात आनंदाचे वातावरण होते. यावेळी अनेक माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत आर्थिक मदत, टीव्ही आणि इतर उपयुक्त वस्तूंचे दान केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती श्री. दिलीपजी वाघमारे होते. यावेळी सरपंच सौ. मंगला कुंभरे, पोलीस पाटील वनिता वाघमारे, शितल अंबादे, ग्रामपंचायत सदस्य श्री. नरेंद्र गायकवाड, मुख्याध्यापक श्री. विशाल पानढवळे, शिक्षक दिनेश चव्हाण, योगेश चव्हाण, अनमोल राऊत व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जि.प. शाळा ही कुंभाराप्रमाणे असून ती विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य करत आहे,” असे मत श्री. नरेंद्र गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Home गोंदिया जिल्हा जि.प. वरिष्ठ केंद्रीय प्राथमिक शाळा बिजेपार येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न





