गोंदिया, दि.10 :
जिल्हयातील शिष्यवृत्तीकरीता पात्र विद्यार्थी तसेच सर्व महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजर्षी शाहु महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसाईक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निवार्ह भत्ता या योजनांचा लाभ तात्काळ मिळण्याकरीता सन 2018-19 पासुन महाडीबीटी ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे.
त्यानुसार सन 2025-26 हे आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याकरीता अत्यल्प कालावधी शिल्लक राहिलेला आहे. केवळ 75 % शिष्यवृत्ती अर्ज भरण्यात आलेले आहे. त्यापैकी 4056 अर्ज महाविद्यालयाने समाजकल्याण कार्यालयाकडे मंजुरीकरीता ऑनलाईन सादर केले आहेत. तसेच 930 अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत. सादर करण्यात आलेल्या अर्जांना मंजुरी देण्यात आली असून विद्यार्थी तसेच महाविद्यालयांना 3 कोटी 57 लाख 25 हजार 459 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अनुसूचित जाती प्रर्वगाची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालय तसेच विद्यार्थी यांना वितरणाची प्रक्रिया सुरु असल्याने ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत शिष्यवृत्तीकरीता आपल्या अर्जाची नोंदणी केलेली नाही, त्यांनी आपले शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ भरुन घ्यावे तसेच महाविद्यालयाने आपल्या महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरणेबाबत सुचित करावे.
तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात यावी. अर्जात काही त्रुटी असल्यास त्याची त्वरित पुर्तता करुन विहीत मुदतीत सादर करुन अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांना शक्य तितक्या लवकर शिष्यवृत्तीचा लाभ देता येईल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित राहिल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी महाविद्यालय प्राचार्याची राहील. देण्यात आलेल्या कालावधीनंतर याबाबत आलेल्या तक्रारींची दखल या कार्यालयामार्फत घेतली जाणार नाही, याची सर्व प्राचार्यांनी नोंद घ्यावी. असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले आहे.






