सूर्याटोला येथे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न
गोंदिया : इतिहासामध्ये जर कोणत्या राजाचे नाव ‘आदर्श राजा’ म्हणून अजरामर झाले असेल, तर ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. त्यांचे जीवन आणि कार्य आजही संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन जयंत शुक्ला यांनी केले. सूर्याटोला, गोंदिया येथील श्री शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने तिथीनुसार आयोजित शिवजयंती उत्सवात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना शुक्ला पुढे म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभारावर आज देश-विदेशात संशोधन सुरू आहे. ज्या काळात समाज परकीय आक्रमणांमुळे आणि अत्याचारामुळे हतबल झाला होता, अशा बिकट प्रसंगी महाराजांनी ‘आशेचा किरण’ बनून अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र केले आणि आक्रमकांना ‘सळो की पळो’ करून सोडले. त्यांनी समाजात केवळ चैतन्यच निर्माण केले नाही, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेला न्याय दिला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदिया नगर परिषदेचे अध्यक्ष सचिन शेंडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव बढे होते. प्रमुख अतिथी म्हणून संजय कुलकर्णी आणि ज्येष्ठ नागरिक धनलाल रहांगडाले उपस्थित होते. यावेळी संजय कुलकर्णी यांनी तरुणांना आवाहन केले की, शिवजयंतीचा हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, समाजहितासाठी आणि वैयक्तिक प्रगतीसाठी काहीतरी संकल्प करण्याचा दिवस आहे; प्रत्येकाने लोककल्याणाचे कार्य अंगीकारावे. याप्रसंगी नगराध्यक्ष सचिन शेंडे यांनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कार्य करीत असल्याचे सांगितले तर श्री बढे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. सोहळ्याची सुरुवात भवानी मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि श्री शिवाजी महाराज स्मारकाचे पूजन करून झाली. त्यानंतर भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश चन्ने यांनी केले, तर प्रास्ताविक रवि हत्तीमारे यांनी मांडले. उपस्थितांचे आभार विनायक नखाते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक अरुण तुपकर, गीतेश तुपकर, प्रणय तुपकर, रवी साऊसाकडे, किसन वाढीवो, पंकज तुपकर, अनिल रहांगडाले, राजेंद्र गुढीकर, नितीन वाढिवे, शुभम तुपकर आदींनी अथक परिश्रम घेतले. या सोहळ्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







