संस्कारातून समाज घडतो आणि हे संस्कार घरातून मिळतात. घरातील मातृशक्ती संस्कार देणारे विद्यापीठ आहे. प्रत्येक घरात हे संस्कार रुजविले गेल्यास पर्यायाने संस्कार समृद्ध राष्ट्र घडेल आणि यातूनच हिंदू धर्माचे रक्षण होईल असे मत विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संपर्क प्रमुख शुभांगी मेंढे यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे आयोजित विशाल हिंदू संमेलनात व्यक्त केले.
यावेळी वंदे मातरम गीत, गो माता पुजन, तुळशी पुजन, नऊ कन्या पुजन, भारत माता पुजनाने, भगवे, पांढरे वस्त्र परिधान करून गावात शोभा यात्रा काढून भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थिताना मार्गदर्शन करताना शुभांगी मेंढे पुढे म्हणाल्या, कुठल्याही बदलाची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी. चांगल्या गोष्टी रुजविल्या गेल्यास त्यातून सकारात्मक बदल पुढे येतात. आज स्वतःला ओळखून हिंदू समाज आणि धर्मासाठी काम करण्याची वेळ आहे. आमच्यातीलच काही, राष्ट्रद्रोही भावनेतून व्यवहार करतात. आज देशाला अशाच लोकांपासून धोका आहे. त्यामुळे स्वत्वाची जाणीव करून देत प्रत्येकाने हिंदू धर्मासाठी पुढे येण्याची गरज आहे. ढासळतच आलेली संयुक्त कुटुंब, संस्कारांचे पतन या गोष्टी चिंतेचा विषय आहे. पंच परिवर्तनाच्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने निर्धार करणे गरजेचे असून मातृशक्तीची यात महत्त्वाची भूमिक असणार असल्याचे शुभांगी मेंढे म्हणाल्या.
भारत मातेची आरती व नंतर महाप्रसादाने कार्यकमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गावातील विवीध मंडळांचे मोलाचे सहकार्य लाभले.







