गोंदिया : शहरातील छोटा गोंदिया येथील चिचबन मोहल्ला येथे जुन्या वादाचा कारणावरून तिघांनी मिळून एकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना गुरूवर, 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. विक्की श्रीराम फरकुंडे (वय 28) असे मृतक युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आज पोलिसांनी काही तासांतच दोन विधी संघर्ष बालकांसह एका युवकाला ताब्यात घेतले आहे.दोन विधी संघर्षित बालक व आरोपी लक्की मेश्राम यांचा मृत विकास फरकुंडे याच्यासोबत मागील दोन महिन्यांपासून वाद सुरू होता. विकास उर्फ वक्की फरकुंडे व आरोपी लक्की सुनील मेश्राम (वय 18, रा. संजयनगर) यांचे जुने भांडण होते. असे असतानाच गुरूवार, 22 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता छोटा गोंदिया येथे त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. या बाचाबाचीतून आरोपी लक्की मेश्राम व दोन विधी संघर्ष बालकांनी त्याला धारदार शस्त्राने गळ्यावर, छातीवर, पोटावर व शरीरावर वार करून ठार केले. श्रीराम बुधराम फरकुंडे (वय 60, रा. छोटा गोंदिया) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम कलम 103 (1) अन्वये शुक्रवारी, 23 ऑगस्ट रोझी पहाटे 3.08 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना शोधण्यासाठी शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करून काही वेळातच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. हा प्रकार घडल्यानंतर एकच खळबळ माजली व पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी खून प्रकरणातील गुन्हेगारांचा कसोशीने शोध घेऊन तत्काळ जेरबंद करून खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक शहर आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनात, शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजू मिश्रा, महेश मेहर, सोमेंद्र तुरकर, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, छगन विठ्ठले, अजय रहांगडाले, चालक पोलीस शिपाई मुरली पांडे, घनश्याम कुंभलवार, खंदारे यांनी कारवाई केली. आरोपी लक्की मेश्राम व विधी संघर्ष बालकांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई प्रक्रिया शहर पोलीस करीत आहेत.

