गोंदिया : विषारी सापाला पकडल्यानंतर पिशवीत टाकत असताना सापाने दंश केल्याने सर्पमित्राचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, 5 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शहराजवळील कारंजा येथे घडली. सुनील उर्फ गुड्डू ताराचंद नागपुरे (रा. बाजार चौक, फुलचूर) असे मृताचे नाव आहे. कारंजा येथील एका घरात सोमवारी रात्रीला विषारी नाग आढळून आला. याबाबतची माहिती सर्पमित्र सुनील नागपुरे यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठत नागाला पकडले. त्यानंतर पिशवीत टाकत असताना नागाने सर्पमित्र सुनील नागपुरे यांच्या हाताला दंश केला. त्यांना काही वेळाने रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. आज मंगळवार 6 ऑगस्ट रोजी दुपारी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

