अंदाजे 50 ते 60 लोकांना लागण : बाधितांनाउपचार घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : तालुक्यातील नवेगावबांध येथे अतिसार रोगाची लागण झाल्याचे तालुका वैद्यकिय अधिकारी अर्जुनी मोरगाव यांनी सांगितले. त्यामुळे पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी गावातील नळ योजनेव्दारे होणारा पाणी पुरवठा उद्या 1 ऑगस्टपासून परिस्थिती सामान्य होईपर्यत बंद ठेवण्याबाबत निर्देश दिले आहे. गावात इंदिरानगर व आखरमोहल्ला म्हणजे प्रभाग क्रमांक तीन व चार येथील काही नागरिकांना अतिसाराची लागवण झाली आहे. इंदिरानगर मधील व आखर मोहल्यातील अंदाजे 50-60 व्यक्तींना अतिसाराची लागण झाली आहे, अशी माहिती आहे. त्यापैकी दोन व्यक्ती येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. उद्यापासून नळाद्वारे पाणीपुरवठा काही दिवसांकरता बंद करण्यात येत असल्यामुळे, गावांतील नळ धारकांनी व गावकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे. बाधित व्यक्तींना दवाखान्यामध्ये दाखल होण्याचे सूचना करण्यात आली आहे. परंतु बाधित व्यक्ती हे-ते कारणे सांगून रुग्णालयात दाखल होण्यास टाळाटाळ करत आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी दिली. अर्जुनी मोरगावच्या तालुका वैद्यकीय अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र पवनीधाबे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दखणे व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी गावात अतिसाराची लागणविषयी माहिती घेतली. याबाबत 30 जुलैला व आज (ता. 31) सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. युगा कापगते व डॉ. शुभांगी बोरकर यांनी ग्रामपंचायतमध्ये आयोजित बैठकीत पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा केली आहे. गावात नवेगावबांध येथील जलाशयातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या मुसळधार पाऊस व पूर आल्यामुळे जलाशयातील पाणी गढुळ झाले आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही असा निर्वाळा आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे अतिसाराची लागण गावात जास्त पसरू नये. यासाठी काही दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येऊ नये, अशा सूचना आरोग्य विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. गावातील पाणीपुरवठ्याच्या टाक्यांचे क्लोरीनेशन करावे. ब्लिचिंग पावडर सारखे तत्सम औषधी वापरून शुद्ध पाण्याचा पुरवठा गावकऱ्यांना करण्यात यावा, असे ठरविण्यात आले आहे. सध्या पावसाळा असल्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी शुद्धीकरण न केलेला गढूळ पाणी नळाद्वारे ग्रामपंचायतीच्या वतीने पुरविला जातो. ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आलेल्या जाहीर सूचनेनुसार उद्या १ ऑगस्टपासून अतिसाराची परिस्थिती सामान्य होईपर्यत नळाचे पाणी पुरवठा करणे बंद करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामवासीयांना करण्यात आले आहे. गावात प्रत्येकाकडे बोअरवेल, विहीर उपलब्ध नाही. गावातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची काळजी घेता येईल. पण बाकीचा कामासाठी पाण्याची सोय कुठून करावी जसे की आंघोळ, शौचालय कपडेलत्ते, भांडी धुणे. आपल्या गावातील किती सार्वजनिक शासकीय विहिरीतील पाणी दैनंदिन उपयोगासाठी कितपत वापरण्या योग्य आहे? सगळ्या गावातील विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकल आहे काय? असे अनेक प्रश्न नागरिकांनी ग्रामपंचायत पुढे उपस्थित केले आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या जाहीर सुचनेनुसार ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या परिसरातील ज्या नागरिकांच्या घरी वैयक्तिक विहीरी उपलब्ध आहेत. त्यांच्या घरील विहिरीमध्ये सध्यस्थितीत असलेला संभाव्य धोका जाईपर्यंत ब्लीचिंग पावडर टाकण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने करावी, अशी मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.
सरपंच व ग्रा.वि. अधिकाऱ्यांचे परस्पर विरोधी आदेशाने आश्चर्य….
नळाद्वारे गावात पाणीपुरवठा उद्या 1 ऑगस्टपासून बंद करण्याचे आदेश ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामविकास अधिकारी रामटेके यांनी दिले आहे. तर दुसरीकडे आजच्या बैठकीत असा कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश आपण कर्मचाऱ्यांना दिले आहे. नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू राहील, असे परस्पर विरोधी आदेश सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी का द्यावे? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उद्या नळाला पाणी येणार…
आज 31जुलैला ग्रामपंचायत मध्ये नळाद्वारे गावात पाणीपुरवठा करायचा किंवा नाही?याबाबत बैठक घेण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने कुठलीही लेखी सूचना ग्रामपंचायतला दिल्या गेली नाही. त्यामुळे नळाद्वारे पाणीपुरवठा करणे काही दिवसासाठी बंद करायचे, असा कुठलाही निर्णय आजच्या बैठकीत झाला नाही. परंतु निर्णय झाला नसताना ग्रामविकास अधिकाऱ्यांनी उद्यापासून नळाद्वारे पाणीपुरवठा बंद करायचा, अशी सूचना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केली होती. परंतु, असा कुठलाही निर्णय झाला नाही. त्यामुळे, पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला पाण्याच्या टाक्या भरण्याची सूचना केली असून उद्या नळाला पाणी येईल.
हिराताई पंधरे, सरपंच, ग्रामपंचायत नवेगावबांध

