नगर परिषद संघर्ष समितीच्या आंदोलनास आमदार कोरोटे करणार नेतृत्व : 16 ऑगस्टपासून धरणे आंदोलन
आमगाव, (गोंदिया) : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदचे न्याय प्रविष्ट प्रकरण राज्य शासनाने निकाली काढले नसल्यामुळे मागील दहा वर्षापासून नागरिकांच्या विकासकामांना खीळ बसली आहे. सदर प्रकरण निकाली काढण्यासाठी आयोजित सर्वदलीय बैठकीस मात्र भाजप नेते पुढाऱ्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे सर्व पक्षातील त्यांची भूमिका स्पष्टपणे कळली नाही.आमगाव नगर परिषद संघर्ष समितीने नगर परिषद स्थापनेचा वाद हा सर्वोच्य न्यायालयात दाखल करून प्रलंबीत ठेवला आहे. त्यामुळे न्याय प्रविष्ट प्रकरण असल्यामुळे नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाहीत. सदर न्यायप्रविष्ठ प्रकरण शासनाने निकाली काढावे यासाठी नगर परिषद संघर्ष समितीने अनेक आंदोलने उपोषणे केली. मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष समितीने आठ गावात निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 14 एप्रिलला बाबासाहेबांना अभिवादन करून निवडणूक सभेत व नगर परिषद संघर्ष समिती प्रतिनिधींना आस्वस्त करून प्रकरण निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु निवडणूक संपून अवघे तीन महिने लोटूनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले शब्द पाळले नाही. नगर परिषद संघर्ष समितीने न्याय प्रविष्ट प्रकरण निकाली काढण्यात यावे यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह येथे सभा आयोजित केली होती. या सभेत संघर्ष समितीचे रवी क्षीरसागर, यशवंत मानकर, उत्तम नंदेस्वर, आमदार सहेसराम कोरोटे, संजय बाहेकर, काशिराम हूकरे, लक्ष्मण चूटे, प्रा. वसंत मेश्राम, सुरेश हर्षे जि.प.सदस्य, कमलबापू बहेकार, संभूप्रसादजी अग्रीका, अनिल शर्मा, दिलीप टेंभरे, देवेंद्र मच्छिरके, महेश उके, रामेश्वर शामकुवर, नरेंद्र निखारे, संतोष श्रीखंडे , घनशाम मेंढे, गजानन भांडारकर, डी.एन. टेंभरे, रमण डेकाटे उपस्थित होते. यावेळी आयोजित बैठकीस आमदार सहेसराम कोरोटे यांनी राज्य सरकारला अनेक निवेदन सादर केली व मुख्यमंत्री, उपमख्यमंत्र्यांसह सचिव यांना सदर प्रकरण निकाली काढण्यासाठी विनंती केली. परंतु राज्य सरकारने कोणतेच पाऊल उचलले नाही. याबाबद पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून यासंदर्भात विनंती करणार व संघर्ष समितीची भूमिका स्पष्ट ठेवणार असे विश्वास त्यांनी व्यक्त केले. तर मागणी मान्य करण्यासाठी संघर्ष समितीच्या पुढाकार घेऊन 16 ऑगस्टपासून धरणे आंदोलन निदर्शने करण्यात येईल, याला मी स्वतः नेतृत्व करणार असे सांगीतले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. सभेचे प्रास्ताविक रवी क्षीरसागर यांनी मांडले तर आभार यशवंत मानकर यांनी मानले.

