Home Uncategorized नवेगावबांध क्षेत्रात खळबळ उडवून देणारा गजराज गोठणगाव, जुनेवानी परिसरात

नवेगावबांध क्षेत्रात खळबळ उडवून देणारा गजराज गोठणगाव, जुनेवानी परिसरात

163
0

शेतात आढळला हत्तीच्या पाऊलखुणा : हालचालीवर वनविभागाची नजर

नवेगावबांध, (गोंदिया) : गेल्या तीन दिवसांपासून नवेगावबांध येथे व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडवून देणारा हत्ती नवेगावबांध व 27 जुलै रोजी दिवसभर कवठा परिसरात होता. मात्र, तो गजराज रविवार, 28 जुलै रोजी गोठणगाव वनपरिक्षेत्रात असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. 26 जुलैच्या रात्री नवेगाव राष्ट्रीय उद्यान परिक्षेत्रातून नवेगाव वन विभाग कॉलनीमधून कवठा परिसरात गेले होते. कवठा परिसरात दिवसभर वास्तव्याला असलेला हत्ती रविवारी गोठणगाव वनपरिक्षेत्रामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती गोठणगाव वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी दिली आहे. आज खोकरी ते चिचोली दरम्यान हत्तीच्या पाऊल खुणा एका शेतात दिसून आल्या आहेत. त्यामुळे हत्ती हा गोठणगाव परिसरात वास्तव्याला आहे, अशी पुष्टी वन विभागाने केली आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यातच अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तीच्या कळपाचा प्रवेश झाला होता, हे येथे उल्लेखनीय आहे. 25 जुलैपासून दोन दिवस हत्ती नवेगावबांध परिसरात राष्ट्रीय उद्यान, येथील जलाशयाच्या ओव्हर फ्लो कडीलटोली वसाहत, म्हणजे हनुमान मंदिर परिसरात हत्तीचे वास्तव्य होते. हत्ती एकच असल्याचे वन व वन्यजीव विभागाकडून सांगीतले जात आहे. काही लोकांनी सदर हत्तीच्या पाऊलखुणा पाहीले होते. हत्तीचा धुमाकूळ व शेतीचे प्रचंड प्रमाणात केलेले नुकसान यामुळे हत्ती आल्याची वार्ता मिळताच शेतकरी वर्गात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. गेल्या आठ दिवसापासून धान पिकाची तालुक्यात व परिसरात झालेले प्रचंड नुकसान पाहून जे थोडे बहुत उरलेले पीक आहे तेही हत्ती नष्ट तर करणार नाही ना ही खरी भीती नवेगावबांध व आता गोठणगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहे. सदर हत्ती हा नवेगावबांध हेलिपॅड ग्राउंड मार्गे पलटूदेव पहाडी कडील शेतातून कापगते यांच्या ऊसवाडीकडून राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात गेल्याचे वनविभागाच्या सूत्राकडून माहिती मीळाली होती. दिवसभर कवठा परिसरात वास्तव्यात असलेला हत्ती खोकरी ते चिचोली मार्गे गोठणगाव परिसरात गेला होता. रात्रीला त्या परिसरात वास्तव्य करून काल दुपारच्या गस्ती दरम्यान हत्ती गोठणगाव वनपरिक्षेत्रातील केळवद येथील योगराज शहारे व कांतीलाल नंदेश्वर यांच्या शेतातून गवर्रा पांदन रस्त्याने परसटोला व तेथुन जुनेवाणी बिटाकडे गेला असल्याची माहिती आहे. प्रादेशिक वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक हत्तीच्या संपूर्ण हालचालीवर नियंत्रण ठेवून आहे. गोठणगाव ते जुनेवाणी पर्यंत प्रादेशिक वन विभागाचे फिरते गस्तीपथक हत्तीच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे. गावातील लोकांना सतर्क राहावे तसेच शेतात जातांनी गटागटांमध्ये सावधरित्या जावे, कुठलीही हरकती करू नये, हत्तीच्या जवळ जाऊ नये. हत्ती बिथरतील असे कुठलेही कृत्य नागरिकांनी करू नये, असे वारंवार वन विभाग व स्थानिक महसूल विभागाकडून इशारा देण्यात येत आहे. नवेगावबांध वन व वन्यजीव, गोठणगाव वनपरिक्षेत्रातील गावात हत्तीचे परिसरातील वास्तव्य व त्यापासून होणारा संभाव्य धोका याबाबत वनविभागाकडून जनजागृती केल्या जात आहे. आता हत्ती जुनेवाणी, राजोली मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करतो की, परत नवेगावबांध परिसराकडे वळतो हे आज रात्री किंवा उद्याला स्पष्ट होईल. दरम्यान नवेगावबांध, कवठा परिसरात व संपूर्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आताही हत्तीची दहशत शेतकऱ्यात व नागरिकात कायम आहे.

संभाव्य धोक्याबाबत गावांत जनजागृती…..

गोठणगाव वनपरिक्षेत्रातील खोकरी ते चिचोली दरम्यान शेतामध्ये हत्तीच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. वन विभागाचे गस्तीपथक हत्तीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच हत्ती परिसरात दाखल झाल्याची व संभाव्य धोक्याबाबत क्षेत्रांतर्गत गावात जनजागृती सुरू आहे.

मिलिंद पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, गोठणगाव