मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर पवार, ठाकरे, पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी – आमदार डॉ.फुके
गोंदिया : मराठा समाजाला, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देण्याची असंवैधानिक मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर आज राज्याचे माजी मंत्री तथा ओबीसी समाजाचे नेते आमदार डॉ. परिणय फुके पुन्हा एकदा समोर आले. फुके यांनी आज उपराजधानीत सांगितले की, महाराष्ट्रात केवळ काही नेत्यांच्या इशाऱ्यावर दोन समाजात भांडण व्हावे असे राजकारण आणि कारस्थान रचले जात आहे. हे कोणाच्या सांगण्यावरून होत आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. आमदार डॉ. फुके म्हणाले, मनोज जरांगे ला असे वाटते की यांच्या पाठीशी समस्त मराठा समाज उभा आहे. जरांगे यांना वाटत असेल तर त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवरून निवडणूक लढवावी. राजकीय षडयंत्रात प्याद्याची भूमिका बजावणाऱ्या जरांगे यांची लोकप्रियता आता संपुष्टात आली आहे. त्यांचे वास्तव आता समोर येत आहे.फुके म्हणाले, जरांगे यांच्या मागे शरद पवार उभे आहेत. शरद पवार यांनी राजकारणाच्या नावाखाली हा कट रचला आणि आरक्षणाच्या नावाखाली दोन समाजांना भांडायला लावले. त्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाही, असे फुके म्हणाले. ते ओबीसी समाजाच्या पाठीशी उभे असून आणि आरक्षणाला धक्का लागू देणार नाहीत. फुके म्हणाले, राज्यातील केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणाचा विचार केला आणि ते मुख्यमंत्री असताना न्यायालयात टिकणारे मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच हे आरक्षण घालविण्याचे काम केले. आजपर्यंत भाजपने ओबीसी समाजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या, कोट्यवधींचा निधी खर्च केला, सबका साथ सबका विकास या मूल्यावर भर दिला. मात्र विरोधकांना राज्यात सर्वांचे कल्याण करणारे सरकार नको, त्यामुळे आरक्षणाच्या नावावर दोन समाजात भांडण करण्याचे राजकीय षडयंत्र ते करत आहेत. जरांगे मराठ्यांच्या नावावर राजकारण करत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे हा त्यांचा उद्देश मुळीच नव्हता. त्यांच्या सर्व मागण्या घटनाबाह्य आणि कायद्याच्या विरोधात आहेत. फुके म्हणाले, मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीवर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट करावी.

