200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
गोंदिया : पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील भुशी धरण येथे पर्यटनास गेलेल्या पर्यटकांसोबत झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होवु नये. तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी प्रजित नायर यांनी जिल्ह्यातील नवेगावबांध/नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, इटियाडोह धरण, हाजराफॉल धबधबा, कचारगढ गुहा, पुजारीटोला धरण, कालीसराड धरण, शिरपूर धरण, चोरखमारा तलाव, बोदलकसा तलाव, चुलबंद प्रकल्प, खडबंदा तलाव, कोरणीघाट व इतर लहान, मध्यम तलाव व धरण तसेच वैनगंगा, बाघ, गाढवी, पांगोली, चुलबंद नदीच्या काठावर किंवा घाटांच्या ठिकाणावर सभोवताली 200 मीटर परिसरात 6 जुलै ते 30 सप्टेबर 2024 या कालावधीत खालील बाबींकरीता मनाई/ प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे. धबधब्या जवळ जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे. पावसामुळे धोके दायक झालेली ठिकाणे, धबधवे, दऱ्यांचे कटडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करण्यास किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघडयावर मद्य सेवन करणे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहने चालविणे. वाहनांची ने-आण करतांना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे, सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघडयावर इतरत्र फेकणे. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल-टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य व अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे. सार्वजनिक ठिकाणी मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डी.जे. सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पीकर/उफर वाजवणे व त्यामुळे ध्वनी प्रदुषण करणे. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे. धबधब्याचे 200 मिटर परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून). वरील आदेशाचे पालन न करणारी/उल्लंघन करणारी कोणतीही व्यवती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

