अॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या व्यावसायिक चित्रपटाने अपेक्षेप्रमाणेच बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. पण या चित्रपटाच्या कथेला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यात रणबीर कपूरने रणविजय हे पात्र साकारलं आहे, तर रश्मिका मंदानाने त्याच्या पत्नीची गीतांजली नावाची भूमिका केली आहे. यात रणविजय विवाहित असून, दोन मुलं असूनही गीतांजलीची फसवणूक करतो असं दाखवण्यात आलं आहे. या सीनवरूनही बरीच टीका होत आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल रश्मिका मंदानाने प्रतिक्रिया दिली आहे.
‘अॅनिमल’मधील रश्मिकाच्या गीतांजली या पात्राला चित्रपट पाहिलेल्या लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. आपणच या भूमिकेबद्दल काही प्रश्न विचारले होते, असा खुलासा रश्मिकाने केला. “गीतांजली. मी तिचे एका वाक्यात वर्णन केले तर… तिच्या कुटुंबाला एकत्र ठेवणारी ही घरातील एकमेव शक्ती असेल. ती शुद्ध, खरी, कोणतेही फिल्टर नसलेली, मजबूत आहे. कधी कधी एक अभिनेत्री म्हणून मी गीतांजलीच्या काही कृतींवर प्रश्न विचारले होते,” असं रश्मिकाने म्हटलं आहे



