गोंदिया (प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता गटांच्या हाताला काम मिळवून देणे आणि त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गोंदियात ‘विभागीय सरस व विक्री महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीने आयोजित हे प्रदर्शन शहरातील प्रीतम लॉन येथे २९ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे यात नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमधील महिला स्वयंसहायता गटांचा सहभाग असणार आहे. यामध्ये ग्रामीण महिलांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक हस्तकला, कापडी वस्तू, गृहपयोगी वस्तू, दर्जेदार मसाले, लोणची, पापड आणि सेंद्रिय धान्य एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. तसेच खवय्यांसाठी विशेष ‘खाऊ गल्ली’ (Food Stall) असून, यात विदर्भातील अस्सल खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. मनोरंजनासाठी दररोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा २९ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष मा. श्री. लायकरामजी भेंडारकर राहतील. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. २९ ते ३१ मार्च दरम्यान सकाळी १०:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा आमचा प्रयत्न असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांना दाद द्यावी आणि त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष मा. श्री. लायकरामजी भेंडारकर यांनी केले आहे.
Home क्रीडा गोंदियात २९ मार्चपासून ‘विभागीय सरस व विक्री महोत्सव’; ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना मिळणार...






