राज्य शासनाच्या महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे प्रथम शिबीर सात मार्चला आणि दुसरे 14 मार्चला राज्यभर आयोजित करण्यात आलेले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात सात आणि 14 मार्चला शिबिराचे आयोजन झालेले असून 14559 नागरिकांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आलेला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रमुख शहरी शासनाच्या सगळ्याच विभागाच्या एकाच छताखाली लाभ देण्यात आलेला होता. त्याचे सुक्ष्म नियोजन करुन महसूल विभागाने महाराजस्व अभियानांतर्गत तालुक्यातील मंडळात नागरिकांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी अभियानाची सुरुवात केलेली आहे आणि याचा सकारात्मक परिणाम नागरिकांच्या जीवनावर होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, 7/12 व 8-अ उताऱ्यांची दुरुस्ती व वितरण, उत्पन्न, रहिवासी, जातीचे व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे वितरण, अकृषक आकारणी अनुषंगाने वन टाईम प्रिमियम भरुन घेणे, अकृषिक (NA) मार्गदर्शन व सुधारणा, भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1 करणे, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप व ई-मोजणी, ॲग्रीस्टॅक आणि पी.एम. किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत केली गेली आहेत.
यामध्ये जिल्ह्यातील 594 नागरिकांचे फेरफार निकाली काढण्यात आलेले आहेत. 758 नागरिकांनी सातबारा मधील दुरुस्ती संदर्भातील अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. 4826 नागरिकांना डिजिटल 7/12 उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल उताऱ्याचा लाभ 2230 नागरिकांनी घेतलेला आहे. 3649 नागरिकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले आहेत. एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकाली काढण्यात आलेल्या एकूण अर्जांची संख्या 2507 आहे. अभियानांतर्गत भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार 5 गाव दप्तर अद्ययावत करण्यात आलेले आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गोंदियाच्या दौऱ्यावर असून यावेळी देखील या अभियानाचा एक विशेष टप्पा जिल्ह्यातील नागरिकांसाठी राबविण्यात येणार आहे. आपल्या जिल्ह्यात महसूल मंत्री स्वतः पाहणी अथवा या निमित्ताने आढावा घेणार आहेत. गोंदिया जिल्ह्याला याचा मान मिळाला याचा अर्थ राज्यांच्या प्रमुखांचे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे.
महाराजस्व समाधान शिबिराचे मंडळ स्तरावर पुर्वतयारी करण्यासंदर्भात 18 फेब्रुवारी ते 5 मार्च पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता. प्रथम टप्प्यात 7 आणि 14 मार्चला मंडळ स्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते.
या शिबिरांमध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, सर्वश्री आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, अप्पर जिल्हाधिकारी मीनाज मुल्ला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अप्पर तहसीलदार, तलाठी यांच्या पुढाकारातून कार्यक्रम झालेला आहे.
एप्रिलमध्ये दिनांक 10 आणि 17 एप्रिल 2026 रोजी, तर मे मध्ये 8 आणि 15 मे 2026 रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायत स्तरावर अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या अभियानाची मदत होत असून खऱ्या अर्थाने शासन नागरिकांच्या दारी पोहोचत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहेत.



