Home गोंदिया जिल्हा राजकुमार बडोले यांचा महाराष्ट्र विधानसभेत पुढाकार; केंद्रीय निधी वापरावर चौकशीची मागणी

राजकुमार बडोले यांचा महाराष्ट्र विधानसभेत पुढाकार; केंद्रीय निधी वापरावर चौकशीची मागणी

8
0
Screenshot

भंते विमांसाच्या न्याय्य मागण्यांसाठी राजकुमार बडोले यांचा  महाराष्ट्र विधानसभेत पुढाकार; केंद्रीय निधी वापरावर चौकशीची मागणी

अण्णाभाऊ साठे वसतिगृह नूतनीकरण; पाली भाषेच्या संवर्धनासाठी ‘पाली भवन’ची मागणी; माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची आग्रही भूमिका

प्रतिनिधी / मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये पाली भाषा विभागाच्या जतन आणि विकासासाठी स्वतंत्र ‘पाली भवन’ इमारतीच्या बांधकामासह अन्य मागण्यांसाठी शांततापूर्ण सत्याग्रह करणारे पीएचडी संशोधक भंते विमांसा यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाठिंबा देत अर्जुनी मोरगावचे आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही बाब उपस्थित केली. अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या पाली भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी राजकुमार बडोले यांनी केली.

शांततापूर्ण सुरू असलेल्या सत्याग्रह आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांबाबत योग्य कार्यवाही व्हावी : राजकुमार बडोले 

२१ ऑगस्ट २०२५ पासून आजपर्यंत अत्यंत शांततेत हा सत्याग्रह सुरू होता. भंते विमांसा यांनी पाली भाषेच्या संवर्धनासाठी अनुदान, स्वतंत्र भवन निर्मिती आणि खेड्यापाड्यातून उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अण्णाभाऊ साठे वसतिगृहाचे नूतनीकरण करण्याची रास्त मागणी केली आहे. जेणेकरून अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी वर्गातील विद्यार्थी चांगल्या वातावरणात राहून शिक्षण घेऊ शकतील, असे बडोले यांनी सांगितले. मात्र आंदोलनादरम्यान विद्यापीठ परिसरात काही घटना घडल्या ज्यात आंदोलकांना सुरक्षारक्षकांकडून मारहाण करण्यात आली या उलट आंदोलकांविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण झाल्यावर आंदोलकांना गंभीर अवस्थेत इस्पितळात न नेता पोलीस स्थानकात नेणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. कोणतीही नोटीस न देता, कायदेशीर प्रक्रिया न पाळता त्यांचा पीएचडी चा प्रवेश रद्द करणे आणि कुलसचिवांनी पोलीस प्रशासनास खोटी पत्रे लिहिणे, भंते विमांसा यांचे सामान, पुस्तके वसतिगृहाच्या बाहेर फेकून देऊन त्यांची खोली सील करणे अत्यंत दुःखद असून भंते विमांसा यांच्या मागण्या अत्यंत छोट्या आणि रास्त आहेत त्यामुळे यावर तोडगा काढण्या ऐवजी आंदोलकांना हुसकावणे अत्यंत चुकीचे असल्याचे राजकुमार बडोले यांनी सांगितले. 

केंद्रीय निधीच्या प्रभावी वापरासाठी चौकशीची मागणी

केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाने मंजूर केलेला निधी पाली विभागाच्या विकासासाठी योग्य प्रकारे वापरला जावा. तो निधी परत गेल्यास याबाबत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पाली विभागाला स्वतंत्र भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी राजकुमार बडोले यांनी केली.

सामाजिक न्याय आणि शिक्षणासाठी बडोले यांचा सतत पाठपुरावा

माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नेहमीच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि भाषा संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत. या मुद्द्यावर शासनाने तत्काळ लक्ष घालून कार्यवाही करावी आणि आंदोलकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केलीय असून या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले.