जनतेच्या समस्या निराकरणाचे नियोजन ; पुढील तीन महिन्यात आयोजन
गोंदिया, दि.27 :महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर पुढील तीन महिन्याच्या कालावधीत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” राबविले जाणार आहे.
सदर शिबिराचे पूर्वतयारी नियोजन तसेच या अभियाना मार्फत जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत महसूली योजनांचा लाभ पोहचावा तसेच जनतेच्या समस्यांचे निराकरण व्हावे याबाबत तयारी करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसीलदार यांना दिल्या. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी व सर्व तहसिलदार यांचेकडून या अभियानाचा आढावा घेतला तसेच काही सूचनाही केल्या.
आगामी 7 ते 14 मार्च दरम्यान गोंदिया जिल्हयातील सर्व तालुक्यात मंडळ स्तरावर शिबिरे घेण्यात येणार आहे. यानंतर 10 ते 17 एप्रिल दरम्यानही हे आयोजन असेल, नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर 8 ते 15 मे दरम्यान आयोजन होणार आहे. याअनुषंगाने सर्वांसाठी घरे, वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरीत करणे, जमिनी अकृषक करणे, तुकडेबंदी, पांदण रस्ते, पट्टे वाटप, विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरीत करणे आदीबाबत कार्यक्रम आखण्यात आला आहे. शिबिराचे स्थळ व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्यापासून सर्व आवश्यक सोयी करण्यासह पात्र लाभार्थ्यांच्या याद्या करणे आदीबाबत जिल्हाधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी मिनाज मूल्ला, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) मानसी पाटील तसेच उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड उपस्थित होत्या. गोंदिया, देवरी व अर्जुनी मोरगाव चे उपविभागीय अधिकारी आणि सर्व तहसिलदार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. एमसँड धोरणाबाबत विभागात असलेल्या सध्यास्थितीची माहिती त्यांनी घेतली. शासकीय जमिनीवरील 2011 पूर्वीचे अतिक्रमण नियमानुकूल करून पात्र लाभार्थ्यांना करावयाच्या पट्टेवाटपाच्या स्थितीची माहितीही जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी जाणून घेतली. सर्वच पात्र लाभार्थ्यांना समाधान शिबिरामध्ये पट्टेवाटप करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.






