सडक अर्जुनी:- होळी सणाच्या शुभ प्रसंगी निसर्गवेध संस्था पुणे,शाखा पिटेझरी च्या प्रयत्नाने आणि ब्रिजनेक्स्ट कंपनी च्या सौजन्याने फुलीचंंदजी भगत विद्यालय कोसमतोंडी या शाळेला ब्रिजनेक्सट ( BRIDGENEXT) कंपनी चा संपूर्ण संगणक संच भेट देण्यात आले. निसर्गवेध संस्था, पुणे ची पिटेझरी येथे शाखा आहे. पिटेझरी हे शंभर टक्के आदिवासी गाव असून नागझिरा अभयारण्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. येथे सदर संस्थची शाखा निसर्गमित्र किरण वसंत पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. किरण वसंत पुरंदरे हे या शाखेचे संचालक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून हे परीसरामध्ये विविध पर्यावरण स्नेही उपक्रम यशस्वी पणे राबवित आहेत.परीसरा मध्ये वृक्षारोपण, वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मुलन यावर जनजागृती करण्यात येत आहे. आता पर्यंत सदर संस्थेच्या वतीने अडीच लाख फळ झाडांचे विनामूल्य परीसरातील नागरीकांना वाटप करण्यात आले आहे. सदर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आठ किलोमीटर लांबीची लोखंडी तारेचे कुंपण घालून दिले आहे. या संस्थेच्या माध्यमातून गावातील मुलांसाठी पाखरं शाळा हा उपक्रम राबविला जात आहे. ही शाळा निसर्गाच्या सानिध्यात भरविण्यात येते. तसेच महीला करीता उद्योग समूह सुरू करून त्यांनी बनविलेल्या हस्त कला साहित्य देश विदेश मध्ये विकल्या जात आहेत.सदर उद्योग समूह मध्ये सध्या अठ्ठ्यात्तर महिला कार्यरत आहेत. निसर्ग वेध संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी अविरत प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर संस्थेच्या वतीने शाळेला संगणक संच भेट देण्यात आले. त्याबद्दल शाहू फुले आंबेडकर पुरस्कार प्राप्त संत बांगळु बाबा आदिवासी शैक्षणिक सुधारणा मंडळ मालुटोला संस्था आणि फुलीचंदजी भगत विद्यालय कोसमतोंडी यांनी सदर संस्थेचे आभार मानले. या कार्याकरीता निसर्ग मित्र, संचालक किरण वसंत पुरंदरे आणि त्यांचं सहकारी सतीश हरिश्चंद्र टेकाम व मयुर किशोर टेकाम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

