गोंदिया : वन्यप्राणी रानडुक्कर व चितळाची शिकार करणार्या चार आरोपींना अर्जुनी-मोरगाव वन परिक्षेत्राच्या पथकाने रविवारी ताब्यात घेतले आहे. तर संशयीत आरोपींच्या घर झडतीतून दोन भरमार बंदूकांसह इतर साहित्य तसेच रानडुक्कर व चितळाचे मास जप्त केले आहे. मागील महिन्यात देवरी दक्षिण वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने १८ व २६ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून शिकारीचे फासे व इतर साहित्य जप्त केले होते. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी वन विभागाकडून कारवाई करण्यात येत असताना जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजीव नगर येथील विशाल सहारे याच्या घरी वन्यप्राणी चितळाचे मास असल्याची माहिती अर्जुनी मोरगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी आपल्या ताफ्यासह विशाल शहारे यांच्या घरी छापामारी कारवाई केली. यावेळी त्याच्या घरून ४.५०० किलो वन्यप्राणी चितळाचे मास मिळून आले. अधिक तपासात शिकार करण्याकरिता उपयोगात आणणारी 2 नग लोखंडी सळई तसेच १० नग शिकारीचे फासे मिळून आले आहेत. यावेळी संशयित आरोपी विशाल सहारे याची कसून चौकशी केली असता, त्याने जवळच्या बरडटोली येथील बलदेवसिंग धर्मेद्रसिंग टाक व आणखी दोन संशयित आरोपींसोबत वन्यप्राण्यांची शिकार केल्याचे पुढे आले. दरम्यान, बलदेवसींग टाक याच्या घराची झळती घेतली असता त्याच्या घरातून चितळ व रानडुक्कर चे शिजलेले व कच्चे मास तसेच दोन भरमार बंदुक व इतर साहित्य मिळून आले. दरम्यान, वन विभागाच्या पथकाने या प्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळील शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर चारही संशयितांच्या विरोधात वन गुन्हा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, नवेगांवबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. पुढील तपास अर्जुनी मोरगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. कटरे करीत आहेत.
Home Uncategorized रानडुक्कर आणि चितळाची शिकार करणार्या चौघांना अटक; अर्जुनी मोरगाव वनविभागाची कारवाई

