Home Uncategorized गोंदिया जिल्ह्यात 25 महसूल मंडळात अतिवृष्टी, 14 मार्ग बंद

गोंदिया जिल्ह्यात 25 महसूल मंडळात अतिवृष्टी, 14 मार्ग बंद

156
0

सडक अर्जुनी, अर्जुनी मोर व देवरी या तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी

गोंदिया : हवामान विभागाने 19 व 20, 21 जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुरूप विदर्भात पावसाने हाहाकार माजविले. मात्र गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी व जिल्हावासी सुखावल्याचे चित्र पहावयास मिळाले. सकाळपर्यंत जोरदार पाऊस पडल्याने जिल्ह्यातील पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. एंकदरीत जिल्ह्यातील २५ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली. आजच्या पावसामुळे रोवणीच्या कामांना वेग आले आहे. असे असले तरी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी या तीन तालुक्यात सर्वदूर पाणीच पाणी असल्यामुळे रोवणीचे काम खोळंबले होते. सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी या तीन तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक मार्गावरील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली होती. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगावदेवी- खांबी, बोरी-कोरंभीटोला, महागाव-बोरी, केशोरी-वडसा, दिनकरनगर-केशोरी, प्रतापगड-करांडली, मांडोखाल-बोरी, इसापूर-माहुरकुडा, इसापूर-महागाव, निलज-केशोरी, खामखुर्रा-धानोरी त्याचप्रमाणे देवरी तालुक्यातील देवरी-शेडेपार, देवरी-कन्हाळगाव, शिलापूर-फुक्कीमेटा या मार्गावरील वाहतूक बंद पडून गावा-गावातील संपर्क तुटले होते. मुसळधार पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यात घराची पडझडही सुरू झाली. धाबेटेकडी टेकडी येथील दिलीप मधुकर कार्णिक यांचे घर पूर्णत: पडला. त्याचबरोबर किर्ती सोनवाने, रामचंद सोनवाने यांचे घरही पावसाने क्षतिग्रस्त झाले. यामुळे कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक घर व गोठे क्षतिग्रस्त होऊन नुकसान झाल्याचे दिसून आले.

या महसूल मंडळात अतिवृष्टी….

जिल्ह्यातील एकूण 41 महसूल मंडळापैकी 25 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये तिगाव, ठाणा, तिरोडा, ठाणेगाव, मोहाडी, तिल्ली, कावराबांध, सालेकसा, साकरीटोला, आमगाव खुर्द, मुल्ला, देवरी, चिचगड, सिंदीबिरी, ककोडी, नवेगावबांध, बोंडगावदेवी, अर्जुनी, महागाव, केशोरी, गोठणगाव, सौंदड, डव्वा, सडक अर्जुनी, शेंडा या महसूल मंडळांचा समावेश आहे. तर 10 महसूल मंडळात समाधानकारक पाऊस पडला आहे. उर्वरित सहा महसूल मंडळात नावापुरतेच मेघ बसरले.