आ.चंद्रिकापुरे यांचे गृहनिर्माण मंत्री सावे यांना निवेदन
सडक अर्जुनी, (गोंदिया) : यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत वैयक्तिक घरकुल बांधकामाच्या प्रलंबित दायित्वाकरिता तसेच 2023- 24 मधील 362 प्रस्तावांना शासन स्तरावरून कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात यावा. या करिता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मुंबई मंत्रालयात गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन सादर केले. तसेच तात्काळ घरकुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीच्या सभेमध्ये प्रशासकीय मान्यता प्रदान केलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सन 2022- 23 व सन 2023-24 मधील वैयक्तिक घरांच्या बांधकामाच्या प्रस्तावना कार्योत्तर मान्यता व निधी वितरित करणे बाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यानुरूप शासन स्तरावरून सन 2022- 23 मधील 552 प्रस्तावना कार्योत्तर मान्यता प्रदान करण्यात आली असून सदर प्रस्तावापैकी 266.896 लक्ष इतका निधी वितरित होणे शिल्लक आहे तसेच सन 2023- 24 मधील 343 प्रस्तावांना कार्योत्तर मान्यता प्रदान करण्यात आली असून सदर प्रस्तावापैकी 247.736 लक्ष इतका निधी वितरित होणे शिल्लक असून एकूण 515.632 लक्ष निधी तसेच सन 2023- 24 मधील वैयक्तिक घरकुल बांधकामाच्या 362 प्रस्तावना शासन स्तरावरून कार्योत्तर मान्यता व त्याकरिता 489.424 लक्ष रुपये , असे एकूण 1005.056 लक्ष निधी वितरित करण्याबाबत संबंधित विभागाचे मंत्री अतुल सावे यांना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी 27 जून रोजी भेटून सदर योजनेअंतर्गत घरकुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन सादर केले. यावर मंत्री सावे यांनी सकारात्मकता दर्शविली.

