सडक अर्जुनी, (गोंदिया) : तालुक्यातील सौंदड येथे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र, गावातील काही कुटुंब टिल्लू पंप लावून पाण्याची चोरी करतात. यामुळे अनेक घरांना पाणी मिळन्यास अडचण होत होती. दरम्यान त्रस्त नागरिकाँनी ग्रामपंचायत कार्यालयत टिल्लू पंप धारकांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या तारखांना कारवाई करून तब्बल 11 टिल्लू पंप धारकांवर जप्तीची कारवाई केली.सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड ग्राम हे तालुक्यातील सर्वात मोठ गाव आहे. गावात जवळपास 10 हजारच्या वर लोकसंख्या आहे. गावातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे काम पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सातत्याने करण्याचा प्रयत्न करते. परंतु गावातील काही नागरिक टिल्लू पंपच्या माध्यमातून नळ योजनेचे पाणी ओढण्याचे काम करत असल्याने अन्य नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही. ही बाब ग्राम पंचायतच्या निदर्शनास आली. त्यामुळे ग्रामपंचायतीने टिल्लू पंप धारकावर जप्तीची कारवाई केली. ही कारवाई करण्याआधी ग्रामपंचायतने गावात पोंगा लावून नागरिकांना जागृत करण्याच्या दृष्टीने माहिती दिली होती. तसेच नोटीस बोर्डावर नोटीस देखील लावले होते. परंतु गावातील नागरिक ग्रामपंचायतीच्या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करीत सातत्याने पाणी ओढण्याचे काम करीत होते. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे बोअरवेल आहेत ते सुद्धा पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेच्या नळाला टिल्लू पंप लावून पाणी ओढण्याचे काम करीत होते. परिणामी, गावातील नागरिकांना पाहिजे त्या प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक ग्रामपंचायतीकडे या तक्रारी सातत्याने करीत होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या तारखांना कारवाई करून तब्बल 11 टिल्लू पंप धारकांवर जप्तीची कारवाई केली आहे. यात देवा जनबंधू, मनोरमा राऊत, मंगेश शिवणकर, मधुकर भांडारकर, ओमप्रकाश यावलकर, सुनील यावलकर, चुनीलाल साखरे, बाबुराव यावलकर, उमेश सानेकर, मोहन चुटे, मार्कंड नंदरधने अशी टिल्लू पंप जप्त करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार ते पाहण्यासारखे असेल. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जिल्ह्यामध्ये होत असते. परंतु, नियोजनबद्ध काम असल्यास पाणीपुरवठा करता येते, असे सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी यांनी सांगितले आहे. ही कारवाई सरपंच हर्ष मोदी तसेच ग्राम पंचायत सौंदड यांच्या आदेशावरून अतुल दोनोडे, याकुब पठाण, जांभुळकर यांनी केली आहे.

