Home आरोग्य केटीएस जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहार संचाचे वाटप.

केटीएस जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहार संचाचे वाटप.

2
0

गोंदिया: दिनांक २४ मार्च २०२६ रोजी जागतिक क्षयरोग दिनी आरोग्य विभाग जिल्हा परिषद गोंदिया तर्फे केटीएस रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम आणि भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रुग्णालयाच्या समाजसेवा विभागाच्या माध्यमातून रुग्णालयातील अत्यंत गरजवंत अशा क्षयरोग बाधित रुग्णांना न्यूट्रिशन किट वाटण्यात आले. या रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय पंकज प्रकाश तागडे यांच्या समन्वयातून या कार्यक्रमात पोषणयुक्त आहार संच वाटण्यात आले. सदर कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. तृप्ती कटरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमातच विविध दानदाते यांच्याकडून प्राप्त न्यूट्रिशन किट अत्यंत गरजवंत टीबी रुग्णांना वाटण्यात आले. तसेच रुग्णांना समुपदेशन व जनजागृती करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करून क्षयरोग आणि त्याचे दुष्परिणाम तसेच घ्यावयाची खबरदारी या विषयावर प्रकाश टाकला. गोंदिया जिल्ह्याचे शल्य चिकिस्तक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी या आजारावर लोकांमध्ये जनजागृती करून याविषयी लोकांना जागृत करण्याची आणि या रोगाला नियंत्रित करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्याच प्रमाणे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ. तृप्ती कटरे यांनी टीबी हारेगा, देश जितेगा असा नारा देत या अत्यंत घातक आजारावर शासनामार्फत आरोग्य केंद्रावर मोफत उपचार पद्धती उपलब्ध असून टीबीचे लक्षण असणाऱ्या व्यक्तींनी याची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेण्यास सांगितले. न्यूट्रिशन किट देण्यात प्रशिक गडपायले, संविधान इंगोले , निखिल बैस , सनी रामटेके , दिलीप ब्राह्मणकर आदी दानदाते यांनी मदत केली. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत कार्यरत जिल्हा समन्वयक प्रज्ञा कांबळे व सहकार्यानी जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांच्या मार्गदर्शनाखाली या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले.