Home गोंदिया जिल्हा विविध कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरु

विविध कृषी पुरस्कारासाठी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरु

5
0

गोंदिया, दि.24 : महाराष्ट्र राज्य हे कृषि उत्पादन व कृषि उद्योग क्षेत्रात देशात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जाते. ज्यामध्ये दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांचा सन्मान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत करण्यात येतो.

    यामध्ये डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे. सदर पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या हस्ते प्रदान करून संबंधितांना सन्मानीत करण्यात येते.

   यापूर्वी विविध कृषी पुरस्कारांचे प्रस्ताव चार प्रतींमध्ये ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत होते. प्रस्ताव बनविण्यासाठी खर्च येत असल्याने सर्व इच्छुक शेतकरी अर्ज करू शकत नव्हते. या पारंपारिक पद्धतीमुळे प्रस्ताव सादरीकरण, पडताळणी व संकलनासाठी अधिक कालावधी लागत होता. या पार्श्वभूमीवर पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली कृषि विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध आहे.

   सदर संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून पुरस्कार प्रस्ताव सादरीकरण, तपासणी, मूल्यांकन तसेच अहवाल ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात राबविणे शक्य होणार आहे. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन पुरस्कार प्रक्रियेची कार्यक्षमता, विश्वासार्हता व परिणामकारकता अधिक बळकट होणार तसेच शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे फायदा होणार आहे.

       ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज सादर करता येणार. ऑफलाईन चार प्रतींमधील प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारा वेळ व खर्च वाचून प्रस्ताव सादरीकरण जलद गतीने होणार आहे. एकदाच अपलोड केलेली कागदपत्रे पुन्हा-पुन्हा देण्याची आवश्यकता नाही. अर्ज कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती शेतकऱ्यांना सहज मिळणार आहे. छपाई, झेरॉक्स, प्रवास व पोस्ट खर्च कमी होणार असून आर्थिक भार कमी होणार आहे.

   जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी निलेश कानवडे यांनी इच्छुक शेतकरी/व्यक्ती/संस्था/गट यांना सन 2025 करीता विविध कृषी पुरस्कार अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे सादर करणेबाबत आवाहन केले आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी आपला अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीद्वारे 31 मार्च 2026 पर्यंत सादर करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.