दि. 17 फरवरी 2026 रोजी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ यांचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी तालुकास्तरीय अंमलबजावणी पथक तिरोडा तालुक्याची सभा तहसीलदार नारायणजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथील सभागृहात संपन्न झाली.सदर सभेत सदस्य सचिव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी यांनी सभेचे प्रास्ताविक केले.जिल्हा समन्वयक डॉ.ज्योती राठोड यांनी विषयाची संपूर्ण माहिती दिली.सभेला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम,के.टी.एस.सामान्य रुग्णालयाचे सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर,दंत रोग तज्ञ यश जयस्वाल,नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नेहा पटले,पंचायत समिती आरोग्य पर्यवेक्षक अजय वासनिक, आरोग्य निरीक्षक ए.टी बिरंगडे,तालुका आरोग्य सहाय्यक लिलाधर निपाणे यांचे सह उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व आरोग्य सेवक उपस्थित होते.
समिती अध्यक्ष तहसीलदार नारायणजी ठाकरे यांनी सर्व विभागानां विशेष सूचना अमलाबजावणी करुन, दर्शनी भागात फलक लावणे,तालुक्यातील शाळा महाविद्यालय,आश्रम शाळेतून रॅली व प्रभातफेरीचे आयोजन करणे, ग्रामीण स्तरावर ग्राम पंचायत व शहरी भागातील नगर पंचायत यांचे माध्यमातुन जनजागृती व आरोग्य शिक्षण वाढविण्याच्या सुचना यांनी या वेळी दिल्या.
तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0′ अभियान दरम्यान तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणे,शाळा, महाविद्यालये,ग्रामपंचायती,विविध कार्यालये तंबाखूमुक्त करणे आणि तरुणांमध्ये तंबाखूच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण वाढविण्याच्या सुचना गट विकास अधिकारी यांनी याप्रसंगी दिल्या.
लहान मुलांमध्ये वाढत्या तंबाखूच्या वापराला आळा घालण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये तंबाखू मुक्त मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी रॅली, पोस्टर, घोषवाक्य, कविता आणि पथनाट्य यासारख्या उपक्रमाचा समावेश करणे.सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता तालुका आरोग्य अधिकारी,गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक व कर्मचारी यांनी कोटपा कायदा 2003 ची प्रभावी पणे अंमलबजावणीच्या सुचना यावेळी दिल्या.समिती सभेप्रसंगी तालुक्यात तंबाखूच्या दुष्परिणाम व कोटपा कायदा 2003 अंतर्गत येणाऱ्या कलमांची माहिती देऊन सविस्तर मार्गदर्शन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दर्शना नंदागवळी यांनी यावेळी केले.







