डोंगरगाव – रेंगेपार पुलाचे बांधकाम पूर्ण करा : माजी मंत्री राजकुमार बडोले
धाबेटेकडी – अर्जुनी मोरगाव – सुकडी – गोठणगाव – नवेगाव रस्त्याची रुंदी वाढवावी: माजी मंत्री राजकुमार बडोले
मोरगाव – सिरोली – महागाव रस्त्याचे प्र.जि.मा. मधे रूपांतर करावे : माजी मंत्री राजकुमार बडोले
प्रतिनिधी : मागील पंधरा वर्षापासून अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील डोंगरगाव – रेंगेपार पुलाचे काम झालेच नसून ते अर्धवट पडलेले आहे. सोबतच मझगाव पुलाचे बांधकामपूर्ण न झाल्याने प्रचंड अपघात होतात. पुलावरून पाणी जाते. नागरिक आपला जीव धोक्यात घालून प्रवास करतात त्यामुळे ते बांधकाम गरजेचे आहेत. त्याच बरोबर धाबेटेकडी – अर्जुनी मोरगाव – सुकडी – गोठणगाव – नवेगाव हा २२ किमीचा रस्ता असून महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. १९८० च्या पूर्वीच वनसंवर्धन कायदा लागू होण्याच्या आधी हा रस्ता मंजूर झाला होता आणि या रस्त्याची रुंदी साधारण ७.५ मीटर असते. परंतु महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने ने हा रस्ता हाती घेतांना ३.७५ रुंदी ठेवली असून हा रस्ता ईपीसी मोडमधे असल्याने पुढील १० वर्षे या रस्त्याचे देखभालीचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे राहणार आहे. रस्त्यावर पुढील १० वर्षात वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी आशंका माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत व्यक्त केली. त्यामुळे जंगलातून जाणारा १२ किमी लांबीचा रस्ता किमान ५.५ मीटर करण्यात यावा म्हणजे पुढील १० वर्षे दळणवळण सोपे आणि सुगम होईल अशी मागणी माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केली आहे. सोबतच मोरगाव – सिरोली – महागाव रस्त्याचे प्र.जि.मा. मधे रूपांतर करून त्याचे काम देखील महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाने हाती घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

