गोंदिया : देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर भरधाव वेगात धावणाऱ्या ट्रकने राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या वाहनाला जब्बर धडक दिल्याने एक पोलीस कर्मचारी ठार झाल्याची घटना 3 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता घडली. मनीष बहेलीया (वय 32) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मासुलकसा घाटावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आणि नियमाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्यासाठी जात होते. महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव केंद्र कॅम्प डुग्गीपारचे महामार्ग पोलिस पोलीस उपनिरीक्षक दिनेश लिल्हारे, वाहन चालवितांना योगेश बनोटे व मागे बसलेला मनीष बहेलीया (वय 32) घाटावर पोहचले. यावेळी पाईप घेऊन जाणार ट्रॅक क्रमांक सीजी 08 एके 1402 ने भरधाव वेगात चालवून त्याने महामार्ग वाहतूक पोलिसांच्या गाडी क्रमांक एमएच 12 आरटी 9625 ला जोरदार धडक दिली. या कारमध्ये बसलेले पोलिस कर्मचारी मनीष बहेलीया हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोंदियाच्या एका खासगी रूग्णालयात आणताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेसंदर्भात देवरी पोलिस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करीत आहेत.

