गोंदिया : शाळेतील दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या तिसरीतील दोन विद्यार्थ्यांचा मुरमाच्या खाणीच्या खड्ड्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गोंदिया तालुक्यातील दासगाव खुर्द येथे मंगळवार, 13 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारात घडली. आलोक भागचंद बिसेन व प्रिन्स किशोर रहांगडाले अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. आलोक व प्रिन्स हे दोघेही दासगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होते. आज (मंगळवारी) दुपारी जेवणाच्या सुट्टीत जेवण करून ते दोघेही बाहेर फिरायला गेले. मात्र, बराच वेळ झाला ते परत आलेच नाहीत. त्यानंतर शाळेने त्यांच्या पालकांना याची माहिती दिली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पालकांनी शोध घेतला असता शाळेजवळ पाण्याने तुडूंब भरलेल्या मुरुमाच्या खाणीच्या खड्ड्यात दोघांचाही मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती गावात पसरताच घटनास्थळावर गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियातील केटीएस रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

