देवरी, (गोंदिया) : ताराम आदिवासी शिक्षण संस्था देवरी द्वारे संचालित स्व. चंद्रकला ताराम अनुदानितआदिवासी प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा सेरपार प्रकल्प देवरी येथे शुक्रवार, 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक जे.एन. लंजे, सहाय्यक शिक्षक एन.एस. गिर्हेपुंजे, बी.एस. फुंडे, टी.के. हातझाडे, वाय. जी. मेश्राम, शिक्षिका वलके, हेमने यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी निसर्गाचे संवर्धन करण्याची व वाईट व्यसन त्यागण्याची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर माध्यमीक शिक्षक बी.एस. फुंडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना जागतीक आदिवासी दिनाचे महत्व पटवून दिले. या दरम्यान विद्यार्थ्यांनी सामूहिक व व्यक्तिगत नृत्य सादर करून मोठया उत्स्फूर्तपणे सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले. तसेच या कार्यक्रमानंतर, नागपंचमी निमित्ताने अधीक्षक टी. के. हातझाडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून नागपूजन कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वाय. जी. मेश्राम यांनी केले तर उपस्थितांचे आभार मस्करे यांनी मानले.

